Saturday, January 21, 2017

अर्थशास्त्रविषयक संज्ञा


अर्थशास्त्रीय लेखनास वारंवार येणाऱ्‍या काही संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे विशद केलेले आहेत. सर्व संज्ञांचे अर्थ स्थलाभावी देता येणे अशक्य असल्याने, ज्या संज्ञांचा अर्थ कळावयास सुगम आहे, त्या संज्ञांचा समावेश सामान्यपणे करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या संज्ञांचे संक्षिप्त अर्थ खाली दिले असले, तरी त्यांतील काहींच्या स्वतंत्र नोंदीही इतरत्र समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

अंतर्गत काटकसरी (इंटर्नल इकॉनॉमीज) : उत्पादन-संस्थेचे आकारमान वाढल्यामुळे होणाऱ्‍या खर्चातील बचती.
अंतर्मूल्य (इंट्रिझिक व्हॅल्यू) : चलन ज्या वस्तूवर वा धातूवर मुद्रित केलेले असते त्या वस्तूचे वा धातूचे मूल्य.
अंशनियोजन (पार्शल प्लॅनिंग) : अर्थव्यवस्थेतील काही भागाचे नियोजन करून इतर भाग सामान्यपणे नियोजनाच्या कक्षेबाहेर ठेवणे.
अतिरिक्त लोकसंख्या (ओव्हरपॉप्युलेशन) : पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक असलेली लोकसंख्या.
अधिमूल्यन (ओव्हरव्हॅल्युएशन) : क्रयशक्ति-समानता सिद्धांताप्रमाणे योग्य असणाऱ्‍या विदेश-विनिमय-दरापेक्षा आपल्या चलनाचा दर अधिक ठेवणे. यामुळे निर्यात घटते व आयात वाढते.
अनुप्रयुक्त अर्थशास्त्र (अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक्स) : अर्थशास्त्रीय सिद्धांतांच्या व्यावहारिक उपयोगांचा अभ्यास.
अप्रत्यक्ष कर : ज्या करांच्या बाबतीत करदात्याला ते कर स्वतः न भरता करभार दुसऱ्यावर ढकलणे शक्य असते, अशा प्रकारचे कर. उदा., विक्रीकर, उत्पादन-कर.
अर्थसंकल्प (बजेट) : आगामी वर्षाच्या कालखंडातील आपल्या आय - व व्यय-विषयक अपेक्षा व धोरण व्यक्त करणारे शासनाने तयार केलेले अंदाजपत्रक.
अर्धविकसित अर्थव्यवस्था (अंडरडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात औद्योगिक विकास झालेला आहे, अशी अर्थव्यवस्था. अर्थविकसित ही सापेक्ष संकल्पना आहे.
अवमूल्यन (डिव्हॅल्युएशन) : आपल्या चलनाचे परकीय राष्ट्राच्या चलनाच्या तुलनेत मूल्य कमी करणे. यामुळे परदेशातील वस्तू महाग होतात व आयात कमी होते आणि आपल्या वस्तू परकीयांना स्वस्त झाल्यामुळे निर्यात वाढते.
अवरुद्ध खाती (ब्लॉक्ड अकाउंट्स) : ज्या खात्यांतील रकमा काढून घेण्यास प्रतिबंध केला जातो अशी खाती.
अविकसित अर्थव्यवस्था (अनडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास झालेला नाही, अशी अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांचा विकास झालेला नसतो व शेतीही मागासलेलीच असते.
आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) : निर्यात केलेल्या विविध वस्तू व सेवा यांच्यासाठी राष्ट्राला मिळावयाची रक्कम व अशाच आयातीसाठी राष्ट्राने द्यावयाची रक्कम यांचा ताळेबंद. हा प्रतिकूल असेल, तर राष्ट्राला तेवढे सुवर्ण निर्यात करावे लागते किंवा तेवढी तरतूद करण्यासाठी परकीय राष्ट्राकडून किंवा आंतरराष्ट्रीय चलननिधीसारख्या संस्थेकडून कर्ज मिळवावे लागते.
आंतरराष्ट्रीय व्यापारदर (टर्म्स ऑफ ट्रेड) : एखादे राष्ट्र आयात करीत असलेल्या वस्तूंच्या किंमतींची पातळी व निर्यात करीत असलेल्या किंमतींची पातळी यांमधील परस्परसंबंध. आयात मालाचे भाव चढले परंतु निर्यात मालाचे पूर्वीचेच राहिले, तर पूर्वीइतकीच आयात करण्यासाठी अधिक निर्यात करावी लागते, व व्यापारदर त्या राष्ट्राविरूद्ध गेला आहे असा निर्देश केला जातो.
आंतरराष्ट्रीय व्यापारसंतुलन (बॅलन्स ऑफ ट्रेड) : दोन राष्ट्रांतील वस्तूंच्या आयातनिर्यातीच्या एकूण मूल्याचे संतुलन. यात सेवांच्या आयातनिर्यातीचा समावेश नसतो.
आयातकोटा (इंपोर्ट कोटा) : कोणती वस्तू किती आयात करता येईल, ह्या दृष्टीने घातलेली मर्यादा.
आर्थिक मानव (इकॉनॉमिक मॅन) : केवळ आर्थिक प्रेरणांनुसार व्यवहार करणारा अर्थशास्त्रज्ञांनी कल्पिलेला मानव.
इतर परिस्थिती कायम राहिल्यास (सेटेरिस पॅरिबस) : तात्त्विक आर्थिक सिद्धांत व्यवहारात अनुभवास येणे हे विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वावर अवलंबून असल्यामुळे त्यांची परिस्थिति-सापेक्षता दर्शविणारा वाक्प्रचार.
उतरत्या प्रतिलाभाचा नियम (लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स) : इतर उत्पादन-घटकांचे प्रमाण पूर्वीचेच ठेवून एखाद्या घटकाचा अधिकाधिक वापर केल्यास त्या घटकाच्या वापरल्या जाणाऱ्‍या नगांस उत्तरोत्तर कमी कमी उत्पादनफल मिळत जाते, हे तत्त्व.
उत्थान (टेक-ऑफ) : परकीयांच्या मदतीखेरीज स्वयंगतीने पुढील विकास चालू ठेवण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता.
उत्पादन-संस्था (फर्म) : उत्पादन, व्यापार ह्या क्षेत्रांतील प्रवर्तक संघटना.
उत्पादनाचे घटक (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) : उत्पादनप्रक्रियेस आवश्यक असलेले जमीन, श्रम, भांडवल आणि संघटन हे साधन-घटक.
उद्गामी कर (प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस) : अधिक श्रीमंत वर्गावर उत्तरोत्तर वाढत्या दराने आकारले जाणारे कर.
उद्योग (इंडस्ट्री) : एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्‍या प्रवर्तक संघटनांचा समूह.
उपभोक्त्याचे संतोषाधिक्य (कंझ्यूमर्स सरप्लस) : वस्तूस अधिक किंमत देण्याची ग्राहकाची मानसिक तयारी असूनही, ती बाजारातील किंमतीप्रमाणे कमी दरात मिळाल्यामुळे ग्राहकाला मिळणारा अधिक संतोष.
उपभोक्त्याचे सार्वभौमत्व (कंझ्यूमर्स सॉव्हरिन्टी) : उत्पादनाला मागणी प्रेरणा देत असते व मागणी उपभोक्त्यांच्या इच्छेवर व क्रयशक्तीवर अवलंबून असते, या दृष्टीने उपभोक्ता हा सार्वभौम मानला जातो.
उपयुक्तता-मूल्य (यूस व्हॅल्यू) : वस्तूच्या पुरवठ्याचा विचार न करता, तिच्या केवळ उपयोगितेवर मापले जाणारे मूल्य.
उपयोगिता (युटिलिटी) : मानवी गरज भागविण्याची वस्तूची वा सेवेची शक्ती.
ऊर्ध्वाधर-संयोग (व्हर्टिकल इंटिग्रेशन) : उत्पादनातील विविध स्तरांतील क्रियांचे एकसूत्रीकरण.
औद्योगिक संबंध (इंडस्ट्रियल रिलेशन्स) : मालक व कामगार ह्यांचे परस्परसंबंध.
औद्योगिक संयोजनीकरण (इंडस्ट्रियल रॅशनलायझेशन) : उद्योगधंद्याची वा अन्य आर्थिक क्षेत्राची नवीन तंत्रांच्या वा यंत्रांच्या साहाय्याने शास्त्रशुद्ध पुनर्रचना.
करदानक्षमता (टॅक्सेबल कपॅसिटी) : कर देण्याची कुवत. ही व्यक्तीच्या उत्पन्नावर व शासनाच्या धोरणाविषयी तिला वाटणाऱ्‍या उत्साहावर अवलंबून असते.
करभार (इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन) : वसूल केलेल्या कराचा बोजा शेवटी कोणावर किती प्रमाणात पडतो, याचा विचार.
कर्जदेय निधी (लोनेबल फंड) : कर्ज देता येण्यासाठी उपलब्ध असलेली रक्कम.
कल्याण, आर्थिक (वेल्फेअर, इकॉनॉमिक) : संपत्तीच्या उपभोगाने मानवाला मिळणारे समाधान.
किंमतीचा निर्देशांक (प्राइस इंडेक्स नंबर) : विशिष्ट कालखंडात किंमतीत पडलेला तुलनात्मक फरक दाखविणारा सांख्यिकीय अंक. ज्या वर्षातील परिस्थितीशी तुलना करावयाची, त्या पायाभूत वर्षातील किंमतीच्या पातळीचा निर्देश १०० या अंकाने केला जातो व तुलना करावयाच्या वर्षातील पातळीचे मान तुलनेत योग्य अंकाने दाखविले जाते.
क्रयशक्ति-समानता-सिद्धांत (परचेसिंग पॉवर पॅरिटी थिअरी) : दोन राष्ट्रांच्या चलनांतील विनिमयदर हा त्या त्या चलनाच्या आपापल्या राष्ट्रातील क्रयशक्तीवर अवलंबून असतो, हा सिद्धांत.
खुला व्यापार (फ्री ट्रेड) : आयात व निर्यात यांवर कोणतेही कर किंवा इतर निर्बंध नसलेला आंतरराष्ट्रीय व्यापार.
खुल्या बाजारातील व्यवहार (ओपन मार्केट ऑपरेशन्स) : बँकांच्या हातात असणारा रोख पैसा कमी करण्याची इच्छा असल्यास मध्यवर्ती बँक आपल्याकडे असलेले सरकारी कर्जरोखे खुल्या बाजारात विक्रीसाठी काढते, व तो वाढवावा अशी इच्छा असल्यास सरकारी कर्जरोख्यांची खुल्या बाजारात खरेदी करते.
गतिशील अर्थशास्त्र (इकॉनॉमिक डायनॅमिक्स) : कालपरत्वे परिस्थितीत होणाऱ्‍या परिवर्तनाच्या अनुषंगाने केलेले आर्थिक विवेचन.
गरज (वॉन्ट) : एखादी वस्तू वा सेवा उपभोगण्याची मानवी निकड.
गुणक परिणाम (मल्टिप्लायर इफेक्ट) : नव्याने केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्‍या वाढीचे प्रमाण.
घर्षणजन्य बेकारी (फ्रिक्शनल अनएम्लॉयमेंट) : तज्ञ व कुशल कामगारांच्या मागणी-पुरवठ्यात काही काळ असमतोल झाल्यामुळे उद्भवणारी बेकारी.
चलनघट (डिफ्लेशन) : राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत चलनाच्या पुरवठ्यात असलेली तूट.
चलनवाढ (इन्फ्लेशन) : राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत चलनाच्या पुरवठ्यात प्रमाणाबाहेर झालेली वाढ.
चलनाचा भ्रमणवेग (व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी) : एका वर्षभराच्या काळात व्यवहारात चलनविनिमयासाठी वापरले जाण्याचा वेग.
चलनाधारित नियोजन (फायनॅन्शिअल प्लॅनिंग) : उपलब्ध पैसा व त्याचा विनियोग यांच्या आकडेवारीच्या स्वरूपात केलेले नियोजन. नियोजनकाळात किंमतींची पातळी वाढली, तर मुळातील आखणीप्रमाणे पैसा खर्च करून, वस्तूच्या ही उत्पादनाविषयीची नियोजनातील अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही.
तुटीचे अर्थकारण (डेफिसिट फायनॅन्सिंग) : चलनवाढ करून अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्याचा मार्ग. याचा परिणाम भाववाढीत होण्याची शक्यता असते. ज्या काळात भाववाढ इष्ट वाटत असते अशा मंदीच्या काळात, व जेव्हा उत्पादनात वाढ करून भाववाढ काबूत ठेवण्याची शक्यता वाटत असते अशा अप्रगत राष्ट्रांच्या विकासाच्या कार्यक्रमात, या मार्गाचा धोरण म्हणून अवलंब करण्यात येतो.
तुलनात्मक परिव्ययसिद्धांत (प्रिन्सिपल ऑफ कंपॅरेटिव्ह कॉस्ट्स) : दोन वस्तूंच्या उत्पादनखर्चाचे एका राष्ट्रात परस्परांशी असणारे प्रमाण, हे दुसऱ्‍या राष्ट्रातील या प्रमाणाहून भिन्न असले, तर प्रत्येक राष्ट्र ज्या वस्तूंच्या उत्पादनात हे प्रमाण त्या राष्ट्रात कमी असेल (म्हणजेच जी वस्तू त्या राष्ट्राला तुलनात्मक दृष्ट्या कमी खर्चात उत्पादित करता येत असेल) त्या वस्तूचे उत्पादन करते व दुसरी वस्तू त्या वस्तूच्या मोबदल्यात दुसऱ्‍या राष्ट्राकडून आयात करते, हा सिद्धांत.
दरडोई उत्पन्न (पर कॅपिटा इन्कम) : राष्ट्रीय उत्पन्नाला राष्ट्राच्या लोकसंख्येने भागले असता येणारी सरासरी.
दर्शनी किंमत (फेस व्हॅल्यू) : नाणी किंवा नोटा यांवर दर्शविलेले मूल्य.
द्रव्यराशि-सिद्धांत (क्वाँटिटी थिअरी ऑफ मनी) : पैशाचा पुरवठा वाढल्यास पैशाची क्रयशक्ती कमी होते व हा पुरवठा कमी झाल्यास पैशाची क्रयशक्ती वाढते, हा सिद्धांत.
नवसनातनवादी संप्रदाय (अर्थशास्त्र) (निओ क्लासिकल स्कूल, [इकॉनॉमिक्स]) : आर्थिक व्यवहारांच्या आंशिक समतोलाचे मार्शल व त्यांचे अनुयायी यांनी केलेल विवेचन. ह्या संप्रदायाला 'केंब्रिज-संप्रदाय' असेही म्हटले जाते.
नाणेबाजार (मनी मार्केट) : अल्प मुदतीची कर्जे देण्याघेण्याचे व्यवहार जेथे चालतात, असे व्यवसायक्षेत्र.
नियोजन (प्लॅनिंग) : आर्थिक कार्यक्रमाची सूत्रबद्ध आखणी.
नियोजित अर्थव्यवस्था (प्लॅन्ड इकॉनॉमी) : आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाची सूत्रबद्ध आखणी असणारी अर्थव्यवस्था.
निर्वाह-वेतन (सब्सिस्टन्स वेजिस) : श्रमिकाच्या निर्वाहास जेमतेम पुरेल इतके वेतन.
पतनियंत्रण (क्रेडिट कंट्रोल) : बँकांकडून विविध कारणांसाठी केल्या जाणाऱ्‍या कर्जपुरवठ्यावर नियंत्रण.
पतनिर्मिती (क्रेडिट क्रिएशन) : रोख चलनाच्या पायावर बँकव्यवस्थेतून मूळ रोख रकमेच्या अनेक पटींनी केला जाणारा कर्जपुरवठा. समाजात धनादेशाचा वापर करण्याची सवय जितकी अधिक प्रमाणात अस्तित्वात असेल, तितके पतनिर्मितीचे प्रमाण अधिक मोठे असते.
पत-पैसा (क्रेडिट मनी) : बँका व इतर पतसंस्था ह्यांनी निर्माण कलेले व पैशासारखे कार्य करणारे धनादेश, हुंडी, धनाकर्ष इ. स्वरूपाचे विनिमयमाध्यम.
परागामी कर (रिग्रेसिव्ह टॅक्सेस) : श्रीमंत लोकांना जे कर त्यांच्या मिळकतीच्या मानाने कमी प्रमाणात व गरिबांना त्यांच्या मिळकतीच्या मानाने अधिक प्रमाणात द्यावे लागतात, असे कर. अप्रत्यक्ष करांचा परिणाम सामान्यपणे या स्वरूपाचा असतो.
परिमाणात्मक व गुणात्मक नियंत्रणे (क्वाँटिटेटिव्ह अँड क्वॉलिटेटिव्ह कंट्रोल्स) : बँकांकडून होणारा पतपुरवठा विशिष्ट आकारापेक्षा मोठा होऊ नये, यासाठी बँकदरात वाढ, खुल्या बाजारातील व्यवहार व बँकांनी मध्यवर्ती बँकेकडे ठेवावयाच्या ठेवींच्या प्रमाणात वाढ, यांसारखी संख्यात्मक वा परिमाणात्मक नियंत्रणे घालण्यात येतात. बँकांनी सट्टा, साठेबाजी यांसारख्या कारणांसाठी कर्जे देऊ नयेत म्हणून घालण्यात येणाऱ्‍या निर्बंधांना 'गुणात्मक नियंत्रणे' म्हणतात.
पर्यायी उत्पन्न (ट्रान्स्फर अर्निंग) : एखादा उत्पादन-घटक अन्यउपयोगात वापरला गेल्यास त्याला मिळू शकणारे उत्पन्न.
पर्याप्त उत्पादन-संस्था (ऑप्टिमम फर्म) : ज्या आकारमानात सरासरी उत्पादन-खर्च सर्वांत कमी येईल, अशा आकारमानाची उत्पादन-संस्था.
पर्याप्त लोकसंख्या (ऑप्टिमम पॉप्युलेशन) : दरडोई राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होईल, अशी लोकसंख्या.
पूर्ण रोजगारी (फुल एम्प्लॉयमेंट) : श्रमिकांना चालू मजुरीचा दर पसंत असतो व त्या दरात प्रत्येक श्रमिकाला काम मिळू शकते, अशी परिस्थिती.
पैसा (मनी) : समाजमान्य विनिमयाचे माध्यम.
प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्सेस) : सरकारला प्रत्यक्षात कर देणाऱ्‍या व्यक्तीवरच ज्या करांचा भार पडतो असे कर. अशा करांचा भार त्या व्यक्तीला दुसऱ्‍या व्यक्तीवर ढकलता येत नाही. उदा., आयकर.
प्रमाणशीर कर (प्रपोर्शनल टॅक्सेस) : जितक्या प्रमाणात एखादी व्यक्ती अधिक श्रीमंत असेल, तेवढ्याच प्रमाणात अधिक द्यावे लागणारे कर.
प्रवर्तक (आन्त्रेप्रीनर) : उत्पादनक्षेत्रात नेतृत्व आणि उत्पादनघटकांचे संघटन करणारी व नफानुकसानीच्या अनिश्चिततेची जोखीम पतकरणारी व्यक्ती किंवा संस्था.
प्रवेगपरिणाम (अ‍ॅक्सिलरेशन प्रिन्सिपल) : उपभोगाच्या वस्तूच्या मागणीत वाढ झाल्यास त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्‍या उत्पादक वस्तूंच्या मागणीत तीहून अनेक पटींनी वाढ होते, हे तत्त्व.
बाह्य काटकसरी (एक्स्टर्नल इकॉनॉमीज) : उद्योगाला पूरक सोयी (उदा., वीजपुरवठा, वाहतूक, मजूर-प्रशिक्षण-केंद्रे इ.) बाह्य परिस्थितीत उपलब्ध झाल्यामुळे होणाऱ्‍या उत्पादन-संस्थेच्या खर्चातील बचती.
बँक-दर (बँक रेट) : मध्यवर्ती बँक ज्या व्याजाच्या दराने इतर बँकांना कर्जे देते, तो दर. मध्यवर्ती बँकेने हा दर वर नेला, की इतर बँकांनाही आपले कर्ज देण्याचे दर वाढवावे लागतात; त्यामुळे कर्जासाठी येणारी मागणी कमी होते, म्हणजेच पतपुरवठा कमी होतो. याउलट, हा दर मध्यवर्ती बँकेने कमी केला की पतपुरवठा वाढतो.
बाजारभाव (मार्केट प्राइस) : अल्प मुदतीत तत्कालीन मागणीच्या व पुरवठ्याच्या परिस्थितीप्रमाणे ठरणारी वस्तूची किंमत.
भांडवल (कॅपिटल) : उत्पादनकार्यासाठी राखून ठेवलेल्या व भिन्न वस्तू उत्पादन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्‍या साधन-वस्तू.
भांडवल-उत्पादन-प्रमाण (कॅपिटल-आउटपुट रेशो) : भांडवलाच्या गुंतवणुकीचे उत्पादनवाढीशी असणारे प्रमाण.
भांडवलउभारणी (कॅपिटल फॉर्मेशन) : उत्पादनापेक्षा उपभोग कमी असला की भांडवल-बचत होते. या बचतीची उत्पादक कार्यात गुंतवणूक, ही भांडवलउभारणी होय.
भांडवलाची सीमांत फलक्षमता (मार्जिनल एफिशिअन्सी ऑफ कॅपिटल) : भांडवलाच्या विविध परिमाणांच्या गुंतवणुकीने नफ्याच्या प्रमाणात कितपत बदल होईल, ह्यासंबंधीचा अंदाज.
मक्तेदारी (मोनॉपली) : विशिष्ट वस्तूच्या पुरवठ्यावर एकाधिकार-नियंत्रण.
मध्यवर्ती बँक (सेंट्रल बँक) : राष्ट्राच्या बँकव्यवस्थेत सर्व बँक-व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असलेली बँक. चलन छापण्याचा अधिकारही मध्यवर्ती बँकेकडे असतो. ही बँक इतर बँका करीत असलेल्या व्यवहारांच्या क्षेत्रात त्यांच्याशी स्पर्धा करीत नाही.
महाग पैसा (डिअर मनी) : (अ) कर्जपुरवठ्यासाठी व्याजाचा दर अधिक असतो अशी परिस्थिती; (ब) पैशाची क्रयशक्ती अधिक असते व सर्वसाधारण किंमतपातळी खाली असते, अशी परिस्थिती.
मागणी (डिमांड) : विशिष्ट किंमतीत एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहकाने दाखविलेली क्रयशक्तीची सिद्धता.
मागणी-तालिका (डिमांड शेड्यूल) : भिन्न किंमतींना एखाद्या वस्तूचे किती नग ग्राहक विकत घेतील, हे दर्शविणारी तालिका.
मागणीची लवचिकता (इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड) : किंमतीतील फेरबदलाचा मागणीतील फेरबदलावर होणारा परिणाम.
मार्क्सवादी संप्रदाय (मार्क्सियन स्कूल) : भांडबलदार वर्ग आणि श्रमिक वर्ग ह्यांच्या हितामध्ये असणाऱ्‍या अंतर्विरोधाची परिणती वर्गकलहात व अंती भांडवलशाही नष्ट होऊन श्रमिकांचे राज्य येण्यात होते, असे मानणारा मार्क्सप्रणीत संप्रदाय.
मूल्यभेद (प्राइस डिस्क्रिमिनेशन) : वेगवेगळ्या ग्राहकसमूहांना एकाच वस्तूचे आकारलेले भिन्न दर.
मूल्यावपाती विक्री (डंपिंग) : स्वदेशात ठेवलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीने मालाची परदेशात विक्री करणे.
राष्ट्रीय उत्पन्न (नॅशनल इन्कम) : एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रात निर्माण झालेल्या वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनाचे, घसारा वजा करता, राष्ट्रीय चलनाच्या परिमाणात मोजले जाणारे मूल्य.
रोकडसुलभता (लिक्विडिटी) : जिंदगीचे रोख रकमेत रूपांतर करण्याची शक्यता.
रोकडसुलभता-अधिमान (लिक्विड प्रेफरन्स) : हातात रोख रक्कम ठेवण्याची वृत्ती. ही प्रामुख्याने तीन कारणांमुळे उद्भवते : (१) दैनंदिन व्यवहार, (२) आकस्मिक अडचणींच्यासाठी तरतूद आणि (३) भविष्यकाळात वस्तूंचे दर व व्याजाचे दर अधिक अनुकूल व लाभदायक होतील, अशी अपेक्षा.
लाक्षणिक नाणी (टोकन कॉइन्स) : ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य अंतर्मूल्यापेक्षा अधिक असते, अशी नाणी.
लोकोपयोगी सेवाउद्योग (पब्लिक युटिलिटीज) : जनतेस सर्वसाधारणपणे आवश्यक असलेल्या पाणी, वाहतूक, वीज, दळणवळण, आरोग्य, स्वच्छता इ. सेवा देणारे सार्वजनिक उद्योग.
वर्तमान पसंती (टाइम प्रेफरन्स) : भविष्यकाळातील उपभोगापेक्षा वर्तमानकाळातील उपभोगाला प्राधान्य देण्याची स्वाभाविक प्रवृत्ती.
विक्रीव्यय (सेलिंग कॉस्ट्स) : मागणी निर्माण करण्यासाठी केलेला खर्च. उदा., जाहिरात, प्रदर्शने, फुकट नमुने इत्यादी.
विधिमान्य पैसा (लीगल टेंडर) : कायद्याप्रमाणे देण्याघेण्याचे व्यवहार ज्या विनिमयमाध्यमाद्वारा पूर्ण करता येतात, ते चलन.
विनियोग (इन्व्हेस्टमेंट) : उत्पादनाची साधने उपलब्ध करून घेण्याकरिता करण्यात येणारी वचतीची गुंतवणूक.
वैकल्पिक परिव्यय (अपॉर्च्युनिटी कॉस्ट) : उत्पादक घटकाचा वापर एका उत्पादनकार्यात करण्यासाठी त्याच्या अन्य सर्वोत्कृष्ट पर्यायी उपयोगाचा करावा लागणारा त्याग.
व्यापार-चक्र (ट्रेड सायकल) : उद्योग व व्यापार क्षेत्रांत काही वर्षे तेजीची व काही वर्षे मंदीची, असा प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अनुभवास येणारा चक्रनेमिक्रम. अमेरिकेत ही संज्ञा 'बिझिनेस सायकल' म्हणून रूढ आहे.
व्यापार-संरक्षण (प्रोटेक्शन) : स्वदेशातील उद्योगधंद्याचा विकास व्हावा म्हणून परकीय वस्तूंच्या आयातीवर कर लादणे.
श्रमाचे विशेषीकरण : श्रमिकाने एखाद्या विशिष्ट स्वरूपाच्या कामावरच आपली श्रमशक्ती केंद्रित करणे.
सनातन अर्थशास्त्र (क्लासिकल इकॉनॉमिक्स) : स्मिथ, रिकार्डो, मॅल्थस व जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्यांनी केलेले आर्थिक व्यवहारांच्या सर्वसाधारण समतोलाचे विवेचन.
समस्तर संयोग (हॉरिझाँटल इंटिग्रेशन) : एकाच वस्तूचे उत्पादन करणाऱ्‍या उत्पादन-संस्थांचे एकसूत्रीकरण.
समाशोधन (क्लिअरन्स) : विविध बँकाचे परस्परांच्या संदर्भात असलेले धनादेश, धनाकर्ष इ. देण्याघेण्याचे सर्व व्यवहार एकत्रित बेरजा करून एकवट पूर्ण करण्याची पद्धत. ज्या ठिकाणी हे कार्य चालते, त्या ठिकाणाला 'समाशोधनकेंद्र' (क्लिअरिंग हाउस) असे म्हणतात.
सरकारी कर्ज (पब्लिक डेट) : मध्यवर्ती सरकार, राज्य सरकारे, स्थानिक-स्वराज्य-संस्था आणि निगमादी अन्य सरकारी स्वायत्त संस्था ह्या सर्वांनी आपापल्या आर्थिक गरजा भागविण्याकरिता उभारलेले कर्ज.
सरकारी खर्च (पब्लिक एक्स्पेंडिचर) : मध्यवर्ती व राज्य सरकारांनी अर्थसंकल्पानुसार केलेला व्यय.
सांघिक सौदा (कलेक्टिव्ह बार्गेनिंग) : कामगार-संघटनेद्वारा मालकवर्गाशी कामाचे तास, वेतन इत्यादींविषयी केलेला करार.
साकलिक अर्थशास्त्र (मॅक्रो इकॉनॉमिक्स) : एकूण राष्ट्रीय उत्पन्न, भांडवलसंचय, रोजगार आदींचा एकाच वेळी समग्रपणे केला जाणारा अभ्यास.
साधारण किंमत (नॉर्मल प्राइस) : मागणीतील बदलानुसार पुरवठ्याच्या परिस्थितीत बदल झाल्यानंतर दीर्घकालात स्थिरावणारी किंमत.
साधनसामग्रीचे वाटप (अ‍ॅलोकेशन ऑफ रिसोर्सेस) : साधनसामग्रीचा निकडीच्या अग्रक्रमानुसार गरजा भागविण्याकरिता नियोजित केलेला विनियोग.
साधनाधारित नियोजन (फिझिकल प्लॅनिंग) : साधनसंपत्तीचा प्रत्यक्ष वस्तूंच्या स्वरूपात (उदा., जमीन, मजूर, यंत्रसामग्री इ.) विचार करून केलेली विविध उत्पादनाची आखणी.
सामाजिक सुरक्षा (सोशल सिक्युरिटी ) : आजार, बेकारी, अपंगत्व, वृद्धावस्था इ. अडचणींत साहाय्य करण्यासाठी शासनाने केलेली सुरक्षिततेची तरतूद.
सीमांत उपयोगिता (मार्जिनल युटिलिटी) : उपभोगिलेल्या वस्तूच्या शेवटच्या नगाच्या उपभोगापासून मिळणारी उपयोगिता.
सीमांत परिव्यय (मार्जिनल कॉस्ट) : शेवटच्या नगाच्या उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च.
सीमांत पर्याय-प्रमाण (मार्जिनल रेट ऑफ सब्स्टिट्यूशन) : एखाद्या वस्तूचा उपभोग एका परिमाणाने कमी केल्यामुळे होणारी समाधानहानी भरून येण्यासाठी, पर्यायवस्तूचा उपभोग ज्या प्रमाणात वाढवावा लागेल, ते प्रमाण.
सीमांत बचत-प्रवृत्ती (मार्जिनल प्रॉपेंसिटी टू सेव्ह) : उत्पन्नातील बदलामुळे उपभोक्त्याच्या बचत-प्रवृत्तीवर होणारा परिणाम. हा परिणाम मोजण्यासाठी, सामान्यतः उत्पन्नातील बदलामुळे बचतीत होणाऱ्‍या फरकाचे त्या उत्पन्नातील बदलाशी असलेले प्रमाण वापरले जाते. ही संज्ञा केन्स ह्यांनी प्रथम वापरली.
सीमांत सेवनप्रवृत्ती (मार्जिनल प्रॉपेंसिटी टू कन्झूम) : उत्पन्नातील बदलामुळे उपभोक्त्याच्या उपभोग्य वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेतील तीव्रतेवर होणारा परिणाम. हा परिणाम मोजण्याकरिता, उत्पन्नातील बदलामुळे उपभोक्त्याने खरेदीसाठी केलेल्या खर्चातील फरकांचे त्या उत्पन्नातील बदलाशी असलेले प्रमाण वापरले जाते. ही संज्ञा केन्स ह्यांनी प्रथम वापरली.
सुवर्ण-परिमाण (गोल्ड स्टँडर्ड) : सुवर्णाधिष्ठित चलनपद्धती. सुवर्णपरिमाणात चलनाचे मूल्य सुवर्णाच्या रूपात निश्चित केलेले असते.
सूक्ष्म अर्थशास्त्र (मायक्रो इकॉनॉमिक्स) : उद्योगसंस्था, वस्तूंच्या किंमती, उत्पादन-घटकांचे मूल्य आदी प्रश्नांचा सूक्ष्मविभागशः अभ्यास.
सेवन (कन्झम्प्शन) : गरज भागविण्याकरिता केलेल्या वापरामुळे वस्तूच्या उपभोग्यतेचा होणारा लोप.
स्थानीयीकरण (लोकलायझेशन) : एखाद्या ठिकाणी विशिष्ट उद्योगधंद्याचे केंद्रीकरण.
स्थितिशील अर्थशास्त्र (इकॉनॉमिक स्टॅटिक्स) : विशिष्ट प्रकारची परिस्थिती सर्वकाल तशीच कायम राहील, असे गृहीत केलेले आर्थिक विवेचन.
स्वस्त पैसा (चीप मनी) : (अ) कर्जपुरवठ्यासाठी व्याजाचा दर कमी असतो, अशी परिस्थिती; (ब) पैशाची क्रयशक्ती कमी व सर्वसाधारण किंमतपातळी उच्च असते, अशी परिस्थिती.
हुंडणावळ-नियंत्रण (एक्स्चेंज कंट्रोल) : विदेश-विनिमय-नियंत्रण. आयातीसाठी लागणाऱ्या परिकीय चलनाची ज्या वेळी चणचण असते. तेव्हा उपलब्ध असलेले परकीय चलन अधिक महत्त्वाच्या आयातीसाठी नीट वापरले जावे, ह्याकरिता घातलेले नियंत्रण.
हुंडणावळीचा दर (एक्सचेंज रेट) : विदेश-विनिमय-दर. एका राष्ट्राच्या चलनाचा दुसऱ्या राष्ट्राच्या चलनाशी असणारा विनिमय-दर.
हुंडीबाजार (बिल मार्केट) : व्यापारी हुंड्यांच्या खरेदीविक्रीचे व्यवहार जेथे चालतात, असे व्यवसायक्षेत्र.

No comments:

Post a Comment